भारताचा ७१ वा प्रजासत्ताक दिन टिळकनगर विद्यामंदिराच्या भव्य पटांगणावर उत्साहात साजरा झाला.
संविधानाचे वाचन व ध्वजवंदन यानंतर एन्.सी.सी. कॅडेट ( मुली व मुलगे) चे एन्.सी.सी. ऑफिसर श्री. एन्.बी.चौधरी व विदुला साठे यांच्या मार्गदर्शनाखालील शानदार संचलन, डंबेल्स, रिंग, टिपरी, ओढणी अशा विविध साधनयुक्त कवायती,योग, मल्लखांब, मानवी मनोरे यांची नयनरम्य प्रात्यक्षिके, देशभक्तीपर गीते आणि बहारदार लेझिम अशा विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिनाचा आनंद व अभिमान द्विगुणित झाला.
टिळकनगर विद्यामंदिर, टिळकनगर कनिष्ठ महाविद्यालय, टिळक नगर बाल विद्यामंदिर, व लोकमान्य गुरुकुल चे इ.१ वी ते १२ वी चे विद्यार्थी- विद्यार्थिनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सर्व विभागाच्या शिक्षकांनी या कवायती मेहनतीने बसवल्या होत्या. पालक, माजी विद्यार्थी यांची उपस्थिती प्रोत्साहक होती.
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष मा.श्री.श्रीकांत पावगी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मंडळाच्या सदस्य मा. सौ.सविता टांकसाळे, मुख्याध्यापिका सौ.रेखा पुणतांबेकर, सौ.विजया निरभवणे, सौ.स्वाती कुलकर्णी तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. धावणे उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाच्या या संपूर्ण समारंभाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापिका लीना ओक मॅथ्यू यांनी केले.