टिळकनगर विद्यामंदिराच्या इ.१० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप (शुभेच्छा) समारंभ....

दिनांक: 12-Feb-2020


दि.३१ जानेवारी २०२० - टिळकनगर विद्यामंदिराच्या इ.१० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप (शुभेच्छा) समारंभ - बालवर्ग ते १० वी अशी जवळजवळ ११ वर्ष - शाळा, शिक्षक, वर्गमित्र मैत्रिणी यांच्याशी जुळलेले ऋणानुबंध - महाविद्यालयाचे रंगीबेरंगी जग - शाळा सोडून जाण्याचं दुःख अशा संमिश्र भावना विद्यार्थ्यांच्या मनात - काही विद्यार्थ्यांनी ह्या भावना शब्दबद्ध करुन मांडल्या.

शाळेचे पेंढरकर सभागृह विविध रंगांनी फुललं होतं. सावरता न येणाऱ्या साड्या नेसलेल्या विद्यार्थिनी आणि ब्लेझर घालून आपण खूप मोठे झाल्याचा आव आणणारे विद्यार्थी - बघून फार मजा वाटत होती.

शाळेची माजी विद्यार्थिनी ऋजुता लुकतुके ( ब्रॉडकास्ट जर्नलिस्ट, बी.बी.सी.मराठी, नवी दिल्ली) हीने पाठवलेला सुंदर संदेश ऐकून विद्यार्थी भारावून गेले.
उपमुख्याध्यापिका लीना ओक मॅथ्यू यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष मा.श्रीकांत पावगी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि २०२३ साली होणाऱ्या माजी विद्यार्थी संमेलनाचे- आवर्तन ३ चे आमंत्रणही दिले.
सहाय्यक शिक्षिका सौ.श्रद्धा जोशी यांनी बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी घ्यावयाची काळजी यासंबंधी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका सौ.रेखा पुणतांबेकर यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या शुभेच्छा समारंभाचे सूत्रसंचालन इ.९ वी च्या विद्यार्थिनी निर्झरा जोशी व मिताली पाटणकर यांनी केले.
विद्यार्थ्यांना दिलेल्या रिफ्रेशमेंट नंतर शाळेच्या गॅलरीज मधे मोबाईल कॅमेऱ्याचा क्लिकक्लिटाट आणि मित्र-मैत्रिणी व शिक्षकांबरोबर सेल्फी काढायची धूम यामधे कधी दिवस मावळला ते समजलेच नाही.