लोकमान्य गुरुकुल शाळेमध्ये विद्याव्रत संस्कार......

दिनांक: 06-Feb-2019


विद्याव्रत संस्कार

 

मुलांनी स्वावलंबी व्हावे. एकाग्रतेचा सराव मुलांनी केलाच पाहिजे पहाटे लवकर उठून विद्याध्ययन करणे ही चांगली सवय अंगी बाणवली पाहिजे. अभ्यासाबरोबरच घरातली कामे ही मुलांची जबाबदारी आहे.  पालकांनीही मुलांवर कामे सोपवली पाहिजेत. नियमित व्यायाम व प्रमाणात आहार या सवयी मुलांनी पाळल्या पाहिजेत. हे मार्गदर्शन होते तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापिका आणि टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा मा.डॉ. शुभदाताई जोशी ह्यांचे. निमित्त होते रविवार दि. ३ फेब्रुवारी या दिवशी संपन्न झालेल्या लोकमान्य गुरुकुल शाळेच्या इ ८ वी व ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विद्याव्रत संस्कार समारंभाचे.

ज्ञानप्रबोधिनीने इ ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी या संस्काराची रचना केली आहे. उत्तम अभ्यासक्रमाबरोबरच समाजाला योगदान म्हणून स्वावलंबन, सहभाव आणि इतर अनेक मनोवृत्ती घडाव्या लागतात. मनुष्याचे अंतरंग हे व्यक्तिमत्वाचे प्रमुख अंग समजले पाहिजे. हे अंतरंग अधिकाधिक प्रकट होणे म्हणजे व्यक्तिमत्व विकसित होणे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक,आत्मिक आणि सामाजिक हे या विकसित व्यक्तिमत्वाचे पैलू होत.

ज्ञानप्रबोधिनी विस्तार केंद्र डोंबिवलीच्या कार्यकर्त्याची या विद्याव्रताच्या नियोजनात खूप मदत झाली. विद्याव्रत संस्कार पूर्वतयारीसाठी २८ जानेवारी पासून रोज सकाळी सात ते साडे आठ व्याख्यानाचे सत्र आयोजित केले होते. मानवी व्यक्तिमत्वाचा आधार म्हणजे शरीर. शरीराची दीर्घकालीन आरोग्यपूर्ण स्थिती म्हणजे शारीरिक विकास या संदर्भात मुलांशी सौ वैशाली ताई वैशंपायन यांनी संवाद साधला.विविध भावभावना, इच्छा, यांच्यावर नियंत्रण, त्या भावनांचे योग्य प्रकटीकरण त्यांचे संतुलन म्हणजे मानसिक विकास, या संदर्भात व्याख्यान द्यायला वृंदाताई गोडसे आल्या होत्या. विविध घटनांचे आकलन, स्मरण, मूल्यमापन, तर्क करणे, कल्पना विस्तार इत्यादी बुद्धीचे विविध पैलू मुलांसमोर विनयाताई वझे यांनी उलगडून दाखवले.

मी म्हणजे फक्त देह नाही तर ह्या देहापेक्षा खूपच मोठा, या चराचरात भरून राहिलेल्या शक्तीचा “मी” एक अंश आहे हे समजणे म्हणजे आत्मिक विकसन होणे हे खूप सोप्या पद्धतीने अरुणा ताई केळकर यांनी समजावून सांगितले. व्यक्तीचा विकास हा समाजाच्या अस्तित्वाशिवाय, सहकार्याशिवाय, सह्योगाशिवाय शक्य नाही. व्यक्तिमत्वाच्या विकासात सामाजिक पैलू अधिक महत्वाचा कसा हे श्वेता ताई रानडे यांनी एकनाथजी रानडे यांच्या चरित्रातील दाखले देऊन खूप छान समजावून सांगितले व्यक्तीमत्वात या पाचही पैलूंचा सुंदर समतोल विकास झाला तर ती व्यक्ती श्रेष्ठत्वाला पोहोचते. हे ज्योती ताई कर्वे यांच्या व्याखानातून मुलांना समजले.