पबजी या online Game संदर्भात टिळकनगर विद्यामंदिरात पालक उद्बोधन सभेचे आयोजन.....

दिनांक: 16-Feb-2019


पबजी* या online Game संदर्भात *टिळकनगर विद्यामंदिरात  पालक उद्बोधन सभेचे आयोजन* दि.८/२/२०१९

 

शाळेतील विद्यार्थ्यांची वाढती हिंसक वृत्ती बघून चिंता वाटायला लागली आहे.  विद्यार्थी हिंसक का वागतात, त्यांना राग अनावर का होतो याची कारणं शोधण्याचा मी प्रयत्न केला. विभक्त कुटुंब पद्धती, आई-वडीलांमधील वाद- घटस्फोट,  single child, Single Parent , आणि लाड, भौतिक सुखांची चटक, व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेक ही कारणं तर होतीच. पण प्रमुख कारण होतं, - विद्यार्थ्यांमधील Online Games चं प्रमाणाबाहेर Addiction. आणि हे लक्षात आलं एका पालकांसोबत त्यांच्या पाल्याच्या बेशिस्त वर्तणुकीबद्दल बोलताना ! 

 

इ.५वी ते ९ वी चे विद्यार्थी पबजी, फ्री फायर आणि तत्सम  गेम्स किती प्रमाणात खेळतात याचा धांडोळा घ्यायचं मी ठरवलं. शिक्षकांबरोबर चर्चा केली.   वर्गशिक्षकाबरोबर विद्यार्थ्यांचं एक जवळकीचं नातं असतं. त्यांच्याजवळ विद्यार्थी मनमोकळेपणाने बोलतात. तसंच ते आत्ताही बोलले. आणि पबजी, फ्री फायर खेळणारे विद्यार्थी, त्या गेम्सच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या बघून आम्ही सर्व शिक्षक अवाक झालो, बेचैन झालो.

 

हिंसक वृत्ती वाढीस लावणारया , सद्सद् विवेक बुद्धी नष्ट करणारया , संवेदनशीलता नाहिशी करणारया, क्रूरतेतून काहीतरी थ्रील देणारया, आणि हे थ्रील अनुभवता आलं नाही तर त्यातून येणारया नैराश्यातून आत्महत्त्या -- अशी टोकाची भूमिका घ्यायला भाग पाडणारया या गेम्स् चा अभ्यास शिक्षकांना करायला सांगितला. प्रज्ञा बापट, लीना ठाकूर, मनिषा केंद्रे, लीना दाणी या शिक्षिकांनी दिवस रात्र एक करून या गेम्स ची माहिती, लेख  विविध माध्यमातून जमा केली. ह्या संकलित माहितीची एक PPT तयार केली. 

आता हे सगळं सांगायचं होतं हे गेम्स खेळणारया विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर ! पालकांसमोर कोणते शिक्षक बोलतील आणि कोणी कोणते मुद्दे मांडायचे ह्याचं नियोजन केलं. हे करताना शाळेच्या दैनंदिन कामकाजात कुठेही अडथळा येणार नाही याची दक्षता घेतली. वर्गशिक्षकांनी अपेक्षित पालकांशी स्वत:च्या  फोनवरून वैयक्तिक संवाद साधून पालक सभेची कल्पना दिली

शुक्रवार दि. ८ फेब्रुवारी २०१९ रोजी , इ.५ वी ते ७ वी आणि इ.८ वी - ९ वी , अशी २ सत्रात ही पालक सभा घेतली. 

 

 

पालकांच्या मोबाईलवर गेम खेळणारे, पालकांनी शाळेत जायला यायला दिलेले रिक्षेचे पैसे त्याच्यासाठी न वापरता सायबर कॅफे मधे जाऊन हे गेम्स खेळणारे, मोठ्या भावंडांच्या किंवा सोसायटी मधील मोठ्या मुलांच्या समवेत हे गेम्स खेळणारया आपल्या पाल्यांबद्दल ऐकून पालकही काहीसे भांबावले. 

 

 

शाळेच्या समुपदेशिका श्र्वेता बंगाली यांनाही या सभेस मित्रा सांगितले. त्यांनी या गेम्सचा  मेंदूमधील पेशींवर होणारा परिणाम आणि त्यातून होणारे मानसिक व पर्यायाने होणारे वर्तन बदल ह्याबद्दल शास्त्रीय दृष्टीकोनातून माहिती दिली. 

 

 

Distructive  गोष्टींतून मिळणारया क्रूर व instant आनंदापेक्षा वाचन, एखादी कला, एखादा क्रीडाप्रकार यांसारख्या Constructive  गोष्टींच्या सरावातून, साधनेतून मिळणारा आनंद दिर्घकाळ टिकणारा व लाखमोलाचा असतो हे मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे. 

 

 

पालकांना ही सर्व माहिती शाळेच्या शिक्षिका प्रज्ञा बापट यांनी केलेल्या PPT च्या  माध्यमातून सौ.प्रज्ञा बापट, सौ.लीना ठाकूर, सौ.मनिषा केंद्रे, लीना दाणी, सौ.मुग्धा साळुंखे, सौ. गोळे या शिक्षिकांनी दिली. या गेम्समुळे होणारया  दुष्परिणामांचं गांभिर्य पालकांच्या लक्षात आलं. 

 

 

२४ तासातील साडेपाच तास शिक्षकांच्या हाती असलेल्या विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदल शिक्षकांच्या लक्षात येतात मग उरलेला सर्व वेळ पालकांच्या सानिध्यात असणारया मुलांच्या वर्तनातील बदल पालकांच्या लक्षात येत नसतील का ? नक्कीच येत असतील.पण 'एकुलतं एक’, मुलांना 'हवे ते द्या’ या प्रवृत्तीमुळे मुलांच्या वर्तनबदलाकडे बहुतेक पालक दुर्लक्ष करतात. आणि मुलं या हिंसक गेम्स च्या जाळयात कधी आणि कशी गुरफटत जातात हे पालकांनाही कळत नाही. 

 

 

या गेम्सच्या दुष्टचक्रातून लहान मुलं व युवा पिढी ला बाहेर काढण्यासाठी जपान, चिन यांसारख्या पूर्वेकडील देशांनी या हिंसक वृत्ती वाढविणारया गेम्स वर बंदी घातली आहे. आपल्या देशातही गुजराथ मधे या गेम्स वर बंदी आहे. संपूर्ण भारतात या गेम्सवर बंदी आणली पाहिजे. ती येईलही. 

 

 

पण शिक्षकांची आणि पालकांचीही जबाबदारी मोठी आहे, देशाच्या भावी नागरीकांना उत्तम संस्कार देण्याची, त्यांना उत्तम नागरिक म्हणून घडविण्याची ! चला कामाला लागूया.

 

 

-- *© लीना ओक मॅथ्यू*.